ग्रुप ग्रामपंचायत नेवाळे–रानशिगाव, पो. बोईसार, ता. जि. पालघर हे गाव शेतीप्रधान असून येथे प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक वास्तव्यास आहेत. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे, तर आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टीमजुरी आणि इतर मजुरीची कामे करतात. याशिवाय कुक्कुटपालन व बकरीपालन यांसारखे पूरक व्यवसायही येथे केले जातात. पावसाळ्यात, विशेषतः श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या आधी, पावसाच्या सरी आणि नैसर्गिक वातावरणात “अळंबी” ही वन्य भाजी रानात उगवते. ही भाजी अत्यंत चवदार व पौष्टिक असून ती उगवल्यानंतर लगेचच तोडणे आवश्यक असते, कारण उशीर झाल्यास ती खाण्यास अयोग्य होते. त्यामुळे पहाटे लवकर जाऊन अळंबी गोळा करून स्वच्छ केली जाते आणि त्वरित बाजारात विक्रीसाठी नेली जाते. या उपक्रमामुळे पावसाळ्यात आदिवासी बांधवांना अल्पकालीन पण महत्त्वपूर्ण रोजगार मिळतो आणि त्यांच्या उत्पन्नात भर पडते.